दि.29 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे स्पष्ट होत आहे. एका गुजराती वर्तमानपत्राने या तिघांमध्ये अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याचे वृत्त दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि प्रफुल पटेल शुक्रवारी, २६ मार्च रोजी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कुटुंबातील विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अहमदाबादेत आले. वस्तुत: हा विवाहसोहळा शनिवारी, २७ मार्च रोजी होता. परंतु अदानी परिवारातील आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते आदल्या दिवशीच अहमदाबादमध्ये आले.
पवार आणि पटेल दोघेही जण अहमदाबादेत असतानाच अमित शहा यांचेही शहरात आगमन झाले. मात्र, पवार आणि पटेल यांनी शहा यांची भेट घेतली नाही. या तिघांमध्ये भेट झाल्याची नुसतीच चर्चा रविवारी प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती.
शरद पवार आणि अमित शहा यांच्यात कोणतीही भेट झालेली नाही. ही निव्वळ अफवा असून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी सायंकाळी स्पष्ट केले. यासंदर्भातील ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही.
अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम
रविवारी अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्याशी भेट झाली किंवा कसे, या प्रश्नावर थेट उत्तर न देता ‘राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात’, असे सूचक विधान करत संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला बगल देत शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावर मतप्रदर्शन करत भाजप तेथे प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा दावा केला.
खुद्द शरद पवार यांनी या वृत्ताचे खंडन का नाही केले, असे विचारले असता ‘योग्य वेळी हे सर्व उघड होईल. पवार साहेबांची ती सवय नाही. ते योग्य वेळेची निवड स्वत:च करतात’, असे राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले.