
महावितरणला प्रतिसाद ; थकबाकीदारांनी भरले 480 कोटी
सोलापूर,दि.16 : आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला कठीण समयी साथ देत पश्चिम महाराष्ट्रातील 4 लाख घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी गेल्या महिन्याभरात 479 कोटी 64 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. …
सोलापूर,दि.16 : आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला कठीण समयी साथ देत पश्चिम महाराष्ट्रातील 4 लाख घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी गेल्या महिन्याभरात 479 कोटी 64 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. मात्र अद्यापही याच वर्गवारीतील तब्बल 23 लाख 70 हजार 700 ग्राहकांकडे 1384 कोटी 57 लाख रुपयांची थकबाकी असल्याने नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु राहणार आहे.
गेल्या 15 फेब्रुवारीपर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 27 लाख 72 हजार 360 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे 1864 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठांसह सर्व अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष वीजग्राहकांशी संवाद साधत आहे. त्यास प्रतिसाद देत गेल्या महिन्याभरात, 15 मार्चपर्यंत 4 लाख 1 हजार 700 थकबाकीदारांनी 479 कोटी 64 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक 3 लाख 52 हजार 380 घरगुती ग्राहकांनी 303 कोटी 37 लाख, 41 हजार 620 वाणिज्यिक ग्राहकांनी 120 कोटी 40 लाख तर 7660 औद्योगिक ग्राहकांनी 55 कोटी 56 लाखांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
थकबाकीचा भरणा होत असला तरी अद्यापही घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 23 लाख 70 हजार 700 ग्राहकांकडे 1384 कोटी 57 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा (10,75,626) – 738 कोटी 13 लाख, सातारा (2,13,285)– 75 कोटी 33 लाख, सोलापूर (3,40,218)– 178 कोटी 65, सांगली (2,79,340)– 136 कोटी 47 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात (4,62,225) – 255 कोटी 96 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरून सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.
खंडित वीजपुरवठा परस्पर जोडून घेतल्यास फौजदारी कारवाई
महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर झाल्यामुळे नाईलाजाने थकबाकीदारांची वीज खंडित करण्यात येत आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील 80 हजार 591 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये पुणे- 54034, कोल्हापूर- 4341, सांगली- 4342, सोलापूर– 8138 व सातारा जिल्ह्यातील 9736 थकबाकीदारांचा समावेश आहे. नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वेगवेगळ्या पथकांद्वारे वीजजोडण्यांची तपासणी सुरु आहे. यामध्ये थकीत रक्कम न भरता आजूबाजूच्या मीटरमधून किंवा अन्य प्रकारे परस्पर वीजपुरवठा घेतल्यास वीजचोरीचे कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु – चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे.