मुंबई,दि.21 : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी शनिवारी (20 मार्च) केला. या दाव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. “परमबीर सिंग यांना पदावरून का बदलण्यात आलं. ते त्यात ते गुंतलेले होते का? ते गुंतलेले होते असं वाटतं तर त्यांची बदली का केली, चौकशी का केली नाही?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला आहे.” गृहमंत्र्यांनी राज्यातील बाकीच्या पोलिस आयुक्तांना काय सांगितलंय हे तपासावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
मुंबईचं 100 कोटींचं टार्गेट मग इतर शहरांचं काय?
राज्याचा गृहमंत्री मुंबईसारख्या शहराच्या पोलीस आयुक्तांना वसुलीचं टार्गेट देतो हा अतिशय घाणेरडा प्रकार असून मुंबईसाठी जर देशमुखांनी 100 कोटींचं टार्गेट दिलं होतं तर इतर शहरांमध्ये काय परिस्थिती असेल?, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, मला जे आता बोलायचे ते बोलून झाल्यावर मी कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणार नाही. ते माझ्या निवेदनात असेल. का देऊ शकणार नाही किंवा का इच्छा नाही हे पण निवेदनात असेल. कारण प्रश्न विचारल्यावर अनेक विषय निघतात आणि मूळ विषय निघून जातो. त्यामुळे इतर विषयांना मी हात घालणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे. अशी घटना महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासात घडली नाही. एक वर्षे झाले म्हणून 1200 कोटी द्यायला हवी असेल पण लॉकडाऊनमुळे बारबंद होते. त्यामुळे ही वसुली झाली नसेल. राज्यात शहरं किती पोलीस कमिशनर किती त्यांना काय टार्गेट दिला हे अजून बाहेर आलं नाही. गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे ऐकलं होतं, पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं किंवा पाहिलं नव्हतं. परमबीर सिंग यांना पदावरून का बदलण्यात आलं त्यात ते गुंतलेले होते का? ते गुंतलेले होते असं वाटतं तर त्यांची बदली का केली, चौकशी का केली नाही? त्यांना काढून दुसरीकडे बदली केली यातून काय साध्य होतं. तुमच्या अंगावर आलेली गोष्ट झटकून दुसऱ्याच्या खांद्यावर टाकण्याचा हा प्रकार होता, असेही राज ठाकरेंनी सांगितले.
“दहशतवादी बॉम्ब ठेवतात असं आपण आजवर घटना पाहत आलो. पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीनं होणार नाही. केंद्र सरकारनं या प्रकरणाची कसून चौकशी करायला हवी”, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Raj Thackeray Demands Central Government to inquire in the mukesh ambani bomb scare case and allegations on Anil Deshmukh)
“परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र हे गंभीर आहेच. पण मूळ प्रश्न अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला कुणी? कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून बॉम्ब ठेवण्याचं धाडस होणार नाही. त्यामुळे यामागचे खरे हात वेगळेच आहेत. सचिन वाझेची आता धिंड काढली जातेय. पण त्याला शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी घेऊन कोण गेलं होतं? फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याची वारंवार मागणी केली होती, असं फडणवीस यांनी स्वत: सांगितलं आहे. म्हणजे सचिन वाझे हा व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. याची कसून चौकशी राज्याकडून नव्हे, तर केंद्राकडून व्हायला हवी. मग कशी राज्यात फटाक्यांची माळ लागते ते पाहा. कुणाकुणाची नावं बाहेर येतील याची कल्पना देखील आपण करू शकत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.