
दि.८ : देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या युजर्संना चांगले नेटवर्क मिळावे यासाठी एअरटेल (Airtel) सोबत करार केला आहे. या करारामुळे जिओ युजर्संना आणखी चांगले नेटवर्क सुविधा मिळू शकणार आहे. Reliance Jio ने मंगळवारी म्हटले की, त्यांनी आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्ये ८०० मेगाहर्ट्ज बँडमध्ये काही स्पेक्ट्रम खरेदीसाठी भारती एअरटेल सोबत करार केला आहे. हा करार जवळपास १४९७ कोटी रुपयांचा आहे.
रिलायन्स जिओ ८०० मेगाहर्ट्ज बँड मध्ये आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबई मध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रमचा उपयोग करून आपल्या ग्राहकांना आणखी चांगली सुविधा देऊ शकते. या तीन सर्कलमध्ये रिलायन्स जिओकडे एकूण ७.५ मेगाहर्ट्ज अतिरिक्त स्पेक्ट्रम उपलब्ध होणार आहे. जिओच्या माहितीनुसार, हा करार दूरसंचार विभागाकडून जारी स्पेक्ट्रम व्यापाराच्या दिशानिर्देशांनुसार करण्यात आला आहे.
एअरटेलने सुद्धा वेगळ्या पद्धतीने या कराराला दुजोरा दिला आहे. कंपनीला अतिरिक्त स्पेक्ट्रम देण्यासाठी जिओ १,०३७.६ कोटी रुपये देणार आहे. याशिवाय, जिओ स्पेक्ट्रमवरून ४५९ कोटी रुपये नंतर देणार आहे. जो करार संबंधित पार्टनरशीपवर अवलंबून आहे. कंपनीच्या माहितीनुसार, करारासाठी जिओला एअरटेलचे ८०० मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम मध्ये उपयोग म्हणून आंध्र प्रदेशमध्ये ३.७५ मेगाहर्ट्ज, दिल्लीत १.२५ मेगाहर्ट्ज आणि मुंबईत २.५० मेगाहर्ट्ज, हस्तांतरीत केले जाणार आहे. जिओच्या माहितीनुसार, नवीन स्पेक्ट्रम मुळे रिलायन्स जिओची नेटवर्क क्षमता आणखी मजबूत होणार आहे.