• Solapur
  • June 19, 2021
0 Comments

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी दि.१७ : आक्रोश, रडारड आणि उपस्थितांच्या गंभीर मुद्रा एकूणच मन हेलावून टाकणारा प्रसंग आज स्मशानभूमीत पहायला मिळाला.
कुर्डुवाडी शहराच्या इतिहासात एकाचवेळी ७ जणांचा अंत्यविधी करण्यात आला . मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हे सर्व अंत्यविधी बाळाजी कोळेकर यांच्या सहकारी मित्रांनी पीपीई किट घालून उरकले.आज स्मशानाला सुध्दा लाज वाटली असेल इतके भीषण चित्र होते.

कोविडमुळे शहरातील विविध रूग्णालयातील सुमारे ७ कोरोनाबाधित रुग्ण दगावले. या सर्वांचे मृतदेह कापडामध्ये गुंडाळून रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आले.मृतांच्या केवळ पाच नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतांमध्ये शहरातील दोन व परिसरातील पाच व्यक्तींचा समावेश होता.

यावेळी उपस्थितातून तिव्र प्रतिक्रिया आल्या. राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रशासन ओरडून सांगत असताना अनेकजण नियमावलीमधून पळवाटा काढून दुकाने उघडी ठेवत आहेत व ही परिस्थिती तुमच्यावरही येऊ शकते आणि तुमच्यामुळेच इतर निरपराध नागरिकांवरही येऊ शकते. पैसे कमवायच्या आसुरी महत्वकांक्षेमुळे सर्वांचेच जीव धोक्यात येत आहेत. हे सर्व व्यापाऱ्यांनी लक्षात घ्यावे व निर्बंध पाळून शासनाला पर्यायाने कुर्डुवाडी प्रशासनालाही सहकार्य करावे अशी वैफल्यग्रस्त प्रतिक्रिया समाजमाध्यमावर वाचायला मिळत आहेत.

आज कुर्डुवाडी स्मशानभूमीतील विदारक व मन हेलावून टाकणारी परिस्थिती पाहूनही आपण जर निर्बंध पाळणार नसाल तर यापेक्षाही भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. किड्यामुंग्यांसारखी चालताबोलता माणसे मेलेली बघावी लागतील अशा प्रतिक्रिया ही नागरिकांतून उमटत आहेत.
आज स्मशानभूमीत अनेक मृतदेहांचा अंत्यविधी झाला पण तिथे हातपाय धुवायला देखील पाणी नव्हते यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी यांना नागरिकांनी जाब विचारला.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोविड टेस्ट करुन घ्याव्यात.अत्यावश्यक वगळता इतर दुकाने चालू दिसल्यास प्रथम दंड दुसऱ्यावेळी दुकाने सील केली जातील. नागरिक आणि व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिका मुख्याधिकारी समीर भुमकर यांनी केले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!